कोरडवाहू जमिनीवर फुलवली मिश्र फळांची शेती कृषी सहल ; ज्येष्ठ नागरिक संघाची फळशेतीला भेट

कोरडवाहू जमिनीवर फुलवली मिश्र फळांची शेती

कृषी सहल ; ज्येष्ठ नागरिक संघाची फळशेतीला भेट

अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने कृषी सहली अंतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर, माढा व बार्शी या तीन तालुक्यांतील विविध नर्सरी बाग यांना भेटी देवून पीक पाहणी करण्यात आली.ज्येष्ठांनी कोरडवाहू जमिनीवर मिश्र फळांची शेती फुलवलेली पाहून असे प्रयोग मराठवाड्यातही झाले तर शेतकरी हे आर्थिकदृष्ट्या संपन्न होतील अशा प्रतिक्रिया दिल्या.

सध्या पावसाने ओढ दिल्यामुळे चोहीकडेच पर्जन्यमान हे कमी असल्याचे ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांना कृषी सहलीत पाहणी करताना प्रकर्षाने जाणवले.माढा तालुका येथे काही शिवारात खरीपाच्या पेरण्या न झालेल्या दिसून आल्या.तसेच याप्रसंगी बार्शी तालुक्यातील अंजना बाग नर्सरी यास सर्वप्रथम भेट देण्यात आली.नर्सरीचे संचालक राजेंद्र प्रतापराव देशमुख यांनी स्वता: उपस्थित राहून स्वता:ची फळशेती दाखवली.त्यांची 2 एकर मधील खजूर शेती पाहिली.हंगाम संपल्यामुळे बहुसंख्य झाडांना फळे नव्हती. पण,तुरळक झाडांना माञ फळे होती.त्याचा मनमुराद आस्वाद ज्येष्ठ सदस्यांनी घेतला.देशमुख यांनी 25 एकर मधील कोरडवाहू मिश्र फळांची शेती या ज्येष्ठांच्या समवेत चोहीकडे फिरून दाखवली.दोन एकर खजूर शेती व दोन एकर ड्रॅगन फ्रुट शेती असे चार एकर,हनुमान व साधे सिताफळ शेती,गोड चिंचाची व जांभळाची शेती,आंब्याची शेती यांची माहिती त्यांनी स्वता: दिली.

याप्रसंगी ज्येष्ठांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी सांगितले की, खजुराच्या एका झाडापासून 40 ते 50 किलो उत्पादन मिळते. किलोला रुपये शंभरचा हमखास भाव मिळतो. तेव्हा पेंड खजुराच्या एका झाडापासून सुमारे चार ते पाच हजार रुपये उत्पन्न मिळते.यावेळी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे नर्सरीचे संचालक राजेंद्र प्रतापराव देशमुख यांचा सन्मान करण्यात आला.यानंतर ज्येष्ठ नागरिक सदस्यांच्या सदस्यांनी गोरमाळा तालुका बार्शी येथील शेतकरी सुनील देशमुख यांची नर्सरी पाहीली. ढोबळी मिरची तीन एकर,गोल्डन सिताफळ दोन एकर,द्राक्षे एक एकर ॲपल बोर,व सेंद्रिय खतासाठी 50 गावरान गाई,शेळीपालन, केंद्र व दुध डेअरी प्रकल्प याची माहिती स्वतः शेतमालक सुनील देशमुख यांनी दिली. त्यांनी त्यांचे शेतीतले अनुभव सांगताना आपण शेती कशी विकसित केली हे पोटतिडकीने सांगितले.या तरुणाचे अनुभव ऐकल्यानंतर डॉ.डी.एच.थोरात यांनी त्यांची पाठ थोपटली व अभिनंदन केले.
तसेच सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुका व पंढरपुर तालुक्यातील काही ऊस, शेवगा शेती व सीताफळ शेतीला भेट देण्याचाही योग आला.त्यात टमाटा शेतीचे निरीक्षण केले. याप्रसंगी कोरडवाहू मिश्र फळबाग शेतीचे अनुभव अदभुत वाटले.फारच थोड्या पाण्यावर ठिबक सिंचनच्या साह्याने या नर्सरी व बागा फुलविलेल्या दिसल्या या कृषी सहलीमध्ये ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ.डी.एच.थोरात, सहसचिव मनोहर कदम, सदस्य दत्ताञय आंबाड, पुंडलिक पवार,धनराज मोरे,शिवाजी शिंदे, पांडुरंग पवार (देवळा) आदी ज्येष्ठ नागरीक सहभागी झाले होते.

Comments